Wednesday, January 20, 2010

चित्रकला !

एक चित्र अर्धवटच राहिलं.

एक नातं अर्धवटच राहिलं.

थोडासा कोन चुकला.

म्हटलं खोडरबर वापरावं.

चित्राचं ठीक आहे हो पण नात्याचं काय ?

नात्यातले चुकलेले कोन असे थोडेच खोडता येतात.

रेघ ओढतानाच विचार करायचो असतो, नाही का ?

Sunday, January 17, 2010

आठवते का गं तुला ती रात्र ?

प्रेमाच्या रंगमंच्यावर दोन नवी पात्रं !

.

वारा तूफान वाहणारा

चंद्ररंगात न्हायलेला

रातराणीला जागवणारा

आठवतोय का ?

.

कोसळणारा पाउस

मातीच्या उरात धडधड

मग ओल्या मातीतून आलेला गंध

आठवतोय का ?

.

रात्रीच्या भयाणतेवर स्वार होउन

किर्र दाटलेला अंधार

आणि अंधारात माखलेला तूझा माझा संवाद

आठवतोय का ?

.

नकळत झालेला तूझा थंड स्पर्श

गात्र गात्र फूलवीत अजाण हर्ष

बिजलीचा कहर आणि फाटलेल आभाळ

आठवतंय का ?

.

अशा किती वळणांसारखं

ते वळणही आपण वळलो

अता एकाच वाटेवर

उलट दिशेनं जाणारे आपण दोघे

तुला दिसतोय का ?

मर्म

जगण्याशी केली मस्ती , मस्तीचे गाणे केले
लिहिताना गुणगुणताना संगीत मनाचे फुलले !
प्रेमात आर्त डोळे , डोळ्यात बांधुनी पूजा
पूजेत अर्पूनी सा-या देहाचे सोने केले !

स्वप्ने जळून जाता , अश्रूत राख भिजली
राखेत अंकुरावे संस्कार हेच झाले !

प्रत्येक बाजू बिंदू , आयुष्य भूमिती होते
जन्माचे सार सगळ्या शून्यात एकवटले !

मृत्यूचे स्वागत करतो , जगताना सूतक होते
निमिषात वाटले म्हणूनी हे डोळे हसरे केले !


जगाचा कारभार आटोपून सूर्य आपल्या घरी गेला
इतक्यातच या आईच्या कुशीत माझा जन्म झाला !

दिवस कधी पाहिलाच नव्हता, लख्ख प्रकाश माहितीच नव्हता
सोनियाच्या पावसात हा देह कधी न्हायलाच नव्हता !

चंद्राच्या चांदण्यात मार्ग शोधत राहिलो
धुरकटलेल्या रेषात ध्येय हुडकत फिरलो !

मग कळलं हा तर सारा नियतीचा खेळ
चन्द्र सूर्य काढ़ती इथे आपापला वेळ !

तेवढ्यात एक किरण माझ्या देहावर पडला
आणि विस्कटलेल्या हाडात चैतन्य होउन रमला !

मग कसं सार स्पष्ट झालं
सुर्व्यान रातीला गिळाल्याचं कळलं !

आताशा त्या चांदण्या दिसत नाहीत
पण चांदण कसं नीट आठवत
मनात कधी अंधार झाला की
तेच मला मार्ग दाखवत !

Saturday, January 16, 2010

ढगातलं पाणी


लहानपणी,

मी असंच एकदा

माईला विचारलं,

माई ते आकाशात तिकडे

काळं पांढरं कापसासारख काय उडतय ?

माई म्हणाली, ते ढग आहेत

त्यात पाणी असतं।

नंतर एकदा माईच्या डोळ्यात पाणी पाहून मी विचारलं,

माई तुझ्या डोळ्यात काळे पांढरे ढग आहेत ?

ती हसून म्हणाली,

खूप वेळ आकाशात पहात राहिलं,

की डोळ्यात ढग जमा होतात।

काही काळ जमीनीकडही पहावं !

सारीच आंसवे ही का बंडखोर झाली
तू उभी दारात अन रडवून सांज गेली !

त्या रम्य भेटी अपुल्या, संध्येत रंगलेल्या
सा-याच त्या क्षणाना, भूलवून सांज गेली !

साधे असे रहाणे हट्टी स्वभाव माझा
फसवा तूझा नजारा शिकवून सांज गेली !

होतोच मी अडाणी आतून फाटलेला
धागा अता उरीचा उसवून सांज गेली !

कितीदा आम्ही झुरावे कितीदा तूला स्मरावे
तू उभी दारात अन फसवून सांज गेली !

तूझी आठवण

कधी एकटीच भेटते
पहाटेच्या किना-यावर
धुक्याच्या वाळूत
पाय पसरून बसलेली !

कधी बोच-या थंडीत
माळावरल्या बॅगेतली,
पांढरी शुभ्र शाल
लपेटून बसलेली !

वेडं करते
शहाणा करते
पण आयुष्याचं चुकलेलं गणित
उत्तराची अपेक्षा नसतानाही !

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...