Posts

Showing posts from August, 2012

सवाल

तुझ्या डोळ्यांच्या काठावर कलंडलेले थेंब... उसने देशील का?... तुझ्या हातातला मखमली रुमाल... विसरू जाशील का?... तुझ्या उनभिजल्या ओठावरचे शब्द... बोलशील का?... तुझ्या नजरेची पाषाण शिळा... फोडून जाशील का?... तुझ्या रंगरुसल्या चेहऱ्यातलं हसू... पोसशील का?... 

जाग

कधी जाग यावी; उकळत्या कॉफीत आळस फेकून द्यावा; उठून मग खिडकी उघडावी उजव्या हातानं, आणि डाव्या हातातल्या कपामधली कॉफी, थंड होईपर्यंत पीत राहावी; भिरभिरणारं पावसाचं पाणी आणि कावराबावरा झालेला हरवलेला छोटासा पक्षी, दोघांची तळमळ मग निर्ढावलेल्या डोळ्यांनी पाहत रहावी; विजेच्या तारेवरली थेंबांची कसरत बघून टाळ्या वाजाव्यात मनातल्या मनात; टप टप टप टप आणि मग ठप ठप ठप, आणि ऐकत रहावी सगळी सळसळ; वाटतं कधी तरी यावी अशी जाग.