Posts

Showing posts from November, 2011

तूझी आठवण येते...

श्रावणाने निरोप घेतल्यानंतरही, एखादी हट्टी सर, फक्त मातीच्या प्रेमाखातर, तीला मनभर भिजवून जाते, आणि मग मातीचं गंधगीत वारा गुणगुणायला लागतो, तेव्हा तूझी आठवण येते. असल्या असंख्य खोप्यांची तीव्र जखम ओलसर होताना, दूर कुठे तरी, एखाद्याच पाखराची रात्रांधळी फडफड, अंधाराचे तख्त फोडू पाहते, तेव्हा तूझी आठवण येते. दूरवरच्या अस्पष्ट टेकड्या, जेव्हा उगाचंच बडबड करू लागतात, अगदीच अर्थशून्य, आणि बांध फोडून, पिकात शिरू पाहण्याऱ्या, त्या झऱ्याची भाषा, अगदीच समजेनाशी होते, तेव्हा तूझी आठवण येते. कुठल्याशा काठाशी रुजलेल्या, आणि भित्रट तृणात वाढलेल्या रानफुलाशी, मी  मुक्यानेच बोलू पाहतो, जेव्हा त्याची जगण्याची भाषा, माझ्या हृदयाचा ताल बनते, तेव्हा तूझी आठवण येते.

सातच्या बातम्या !

"आडवाणींच्या रथ मार्गावर विस्फोटकं सापडली!" (बहुधा दिवाळीत न उडालेले फटाके कोणीतरी टाकले असावेत. अतिशयोक्ती करावी, पण किती ? ----- मा. बबलू ऊठसूट, युवा काँग्रेस नेते) "रा वन ने मोडले सर्व रेकॉर्ड!" (रेकॉर्ड करणारेच इतके थोर. माय नेम इज खान आणि दबंग ह्या दोन नटांनी टूकारपणाचे रेकॉर्ड मोडीत काढायचे ठरवलेले दिसते. ---- इति ऊद्धव ठोकरे) "पॅलेस्टाइनला सभासदत्व दिल्याने अमेरिकेने युनेस्कोला दिली जाणारी मदत थांबवली" (कोणीतरी अमेरिकेला दिली जाणारी रसद थांबवा अता, पण जपून. ---- इति स्व. सद्दाम हुस्सैन )  "साखर कारखान्यांनी आणि दूध उत्पादकांनी सहकाराची तत्वं धाब्यावर बसवली !" (कमॉन, गिम्मे अ ब्रेक ! --- समडोळीहून सिम्रन, राज, आनी डॉली ) "लेडी गागा ने दिल्लीकरांना दिली संगीताची अभूतपूर्व मेजवानी" (आता कळलं, हे चॅनलवाले ढेकर का देत सुटलेत ते. ---- इति कोचरेकर गुरूजी, मुक्काम पोस्ट बटाट्याची चाळ) "मणिपूरमध्ये जातीसंघर्ष तीव्र !" (जाती ! म्हणजे, माणसे राहतात की काय तिथे ? ----- इति श्री. सोनिया गँधी )